Home About Us Calendar BreakingNews Contact
2018-02-23|R.N.I.No.MAHMAR|2003|14034

Breaking News

केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि भाजप नेते ‘जैश’च्या रडारवर

केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते ‘जैश-ए- मोहम्मद’च्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ‘जैश’चा प्रमुख मौलाना मसूद अझहरने भारतातील नेत्यांना टार्गेट करण्यासाठी दहशतवाद्यांचे एक पथकच तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील काहींनी बांगलादेशमार्गे भारतात प्रवेश केला असून गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार ‘जैश-ए- मोहम्मद’ आणि ‘लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनांनी एकत्र येऊन भारतातील केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांवर हल्ल्यांचा कट रचला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार ज्या मुख्यमंत्र्यांना कमी सुरक्षा त्यांनाच लक्ष्य करण्याची योजना या दहशतवादी संघटनांनी आखली आहे. यासाठी बांगलादेश कॅडरमधील दहशतवाद्यांची मदत घेतली जात आहे. यातील काही दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याची खातरजमा करण्यासाठी ढाकाजवळ लपून बसलेल्या दहशतवाद्यांची माहिती बांगलादेशमधील सुरक्षा यंत्रणांना दिली होती. बांगलादेशमधील सुरक्षा यंत्रणांनी आम्ही दिलेल्या पत्त्यांवर धडकही दिली, मात्र तिथून ठोस माहिती हाती लागली नाही, असे सूत्रांनी सांगितले. अझहरविरोधात भारताते सुरु असलेले प्रयत्न आणि त्याचा भाचा तल्हा रशीदचा सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत खात्मा झाल्याने ‘जैश’ला हादरा बसला आहे. याचा बदला घेण्यासाठी मसूद प्रयत्न करु शकतो, असे सांगितले जाते. पुलवामा आणि अन्य भागांमधील दहशतवादी हल्ल्यांमागे तल्हा रशीदचा हात होता. जम्मू- काश्मीरमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ची जागा घेण्याचा ‘जैश’चा प्रयत्न आहे. ‘जैश’ राज्यात सक्रीय झाली आहे. तर दुसरीकडे सुरक्षा दलाने ‘जैश’विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. दोन दिवसांपूर्वी जम्मू- काश्मीर पोलिसांच्या गुप्तचर विभागानेही लष्कर-ए-तोयबा लेहमधील विमानतळावर हल्ला करु शकते, असा इशारा दिला होता.

मुखपृष्ठ » महाराष्ट्र » शरद पवार, सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला नागपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. वालचंद गिते (३४) असे या तरुणाचे नाव असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. धंतोलीत राहणाऱ्या वालचंद फुलचंद गितेने (वय ३४) १५ नोव्हेंबर रोजी शरद पवार आणि त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जगदीश पंचबुद्धे आणि राहुल कामळे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ५०० आणि ५०९ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ कलमातर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी गितेला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. वालचंद गितेने कृषी विषयात बीएससी केले असून तो विवाहित आहे. त्याला दोन लहान मुलंही आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्त्री ही कोणाची तरी आई, बहीण, मुलगी असते याचे भान ठेवा. स्त्रीयांबद्दल आदर राखायला तरी शिका, असे आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे. कायदा हातात घेऊन तुला धडा शिकवू असा इशाराच आव्हाड यांनी गितेला दिला आहे.

पहिल्या देशी बनावटीच्या विमानावर अखेर शिक्कामोर्तब

कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाला मान्यता; तपासणी केल्यानंतर उड्डाण परवाना महाराष्ट्रीय तरुणाने बनविलेल्या पहिल्यावहिल्या भारतीय बनावटीच्या विमानावर तब्बल १७ वर्षांनंतर विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) मान्यतेची मोहोर उमटविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर कॅप्टन अमोल यादव नावाच्या मुंबईकराने बनविलेल्या सहा आसनी विमानाला मान्यता देण्याचा निर्णय ‘डीजीसीए’ने घेतला असून, या विमानाला (व्हीटी-एनएमडी) नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. येत्या १० दिवसात संचालनालयाचे अधिकारी विमानाची तपासणी करणार असून त्यानंतर उड्डाण परवाना दिला जाणार आहे. त्यामुळे आजवर परदेशी बनावटीच्या विमानांवर अवलंबून राहणाऱ्या भारतातही नजीकच्या काळात विमाननिर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. मूळचा सातारचा आणि सध्या मुंबईकर असलेल्या कॅप्टन अमोल यादव याने १९९८ मध्ये आपल्या ‘थर्स्ट एअरक्राप्ट’ कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्यावहिल्या विमाननिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. पहिला प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्यामुळे नाउमेद न होता यादव यांनी २००३ मध्ये दुसऱ्या विमानाची निर्मिती सुरू केली. तो प्रकल्पही पूर्णत्वास गेला नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात २००९ मध्ये सहा आसनी विमाननिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला. या विमानाला मान्यता मिळविण्यासाठी यादव यांनी सन २०११ मध्ये विमान वाहतूक संचालनालयाकडे अर्ज केला. सुरुवातीस यादव यांच्या विमाननिर्मितीची थट्टा उडवीत संचालनालयाने त्यांचा अर्जच कचऱ्याच्या टोपलीत टाकला. नंतर तो हरवल्याचे आणि ज्या नियमाने नोंदणीचा अर्ज केला आहे, ते नियमच रद्द करण्यात आल्याचे सांगून यादव यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. त्यानंतरही यादव यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला असतानाच पंतप्रधानांची ‘मेक इन इंडिया’ची साद यादव यांच्या कामाला आली. वांद्रे- कुर्ला संकुलात भरलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात परवानगी नसतानाही यादव यांनी महत्प्रयासाने आपले विमान प्रदर्शनात मांडले. त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि या विमानाला मान्यता मिळण्याठी वर्षभर सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. विमान वाहतूक संचालनालयाने मात्र आपली नकारघंटा कायम ठेवल्याने मुख्यमंत्र्यानी थेट पंतप्रधान मोंदी यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी गेली. मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर संचालनालयाने रद्द केलेले नियम पुन्हा अमलात आणत कॅप्टन यादव यांच्या विमानाला नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र दिले. त्याबद्दल यादव कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्र्याची भेट घेऊन आभार मानले.१० दिवसात संचालनालयाचे अधिकारी विमानाची तपासणी करणार असून त्यानंतर उड्डाण परवाना दिला जाईल. हा परवाना मिळाल्यानंतर या पहिल्या विमानाचे उड्डाण सुरू होईल. यादव यांनी आता १९ आसनी विमानाची निर्मिती सुरू केली आहे. या प्रयत्नाची दखल घेत राज्य सरकारने त्यांना पालघर येथे विमानबांधणी प्रकल्पासाठी जागा देऊ केल्याचे कॅप्टन यादव यांनी सांगितले. औद्योगिक विकास महामंडळासोबत हा प्रकल्प सुरू करणार असून त्यासाठी सिकॉमतर्फे वित्तसाहाय्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही यादव यांनी सांगितले.

ठाण्यात रुग्णांसाठी जनावरांच्या औषधांचा वापर

ठाणे जनावरांच्या औषधांवरील लेबल बदलून ती रुग्णांना विकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित मेडिकलचा परवाना रद्द केला असून तशी नोटीसही पाठवली आहे. तसेच मेडिकल आणि फार्मासिस्टविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील 'लाइफकेअर मेडिको'मधून जनावरांची औषधे आणि इंजेक्शन रुग्णांना विकण्यात येत असल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित मेडिकल स्टोअरचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (औषध) गिरीश हुकरे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी २४ ऑक्टोबरला 'लाइफकेअर मेडिको'त तपासणी केली. त्यात ८२ औषधांवर चुकीचे लेबल लावण्यात आल्याचे आढळून आले. औषधांच्या रॅपरवरील लेबलवर मानवी वापरासाठी, तर वरील लेबलवर जनावरांच्या वापरासाठी हे औषध असून ते रुग्णांसाठी वापरता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याचे दिसून आले. ठाण्यातील विविध औषध वितरकांकडून जवळपास अशा प्रकारची ३ हजार औषधे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती हुकरे यांनी दिली.एका गरोदर महिलेला ऑक्सिटोसिन हे औषध दिल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारची औषधे आणखी किती रुग्णालयांतून रुग्णांना देण्यात आली आहेत, याची चौकशी केली जाईल. याबाबबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्सिमॅक आणि ऑक्सिटोसिन या औषधांवर असलेल्या चुकीच्या लेबलबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती, असा दावा लाइफकेअर मेडिकोचे भागीदार रवींद्र शिरोळे आणि फार्मासिस्ट ललिता झिंझाड यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीचे प्रकरण, राफाल घोटाळा, घाईने लादलेला जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून गुजरात विधानसभा निवडणुकीत उघडे पडण्याच्या भीतीपोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणे टाळत आहेत, असा आरोप मंगळवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला. मात्र, हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये बोलावण्यास सरकार प्रतिबद्ध असून, काही दिवसांत घोषणा करण्याची ग्वाही संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी दिली. सरकारला संसदेत राफाल सौदा, जीएसटीचा जाब द्यावा लागेल, या भीतीने मोदी अधिवेशन टाळत असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा आणि खासदार दीपिंदर हुड्डा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

मोटारीत सुरू होते बेकायदा सोनोग्राफी सेंटर

नाशिक स्त्री भ्रूणहत्येविरोधात सरकारने कठोर कायदा केल्यानंतरही काही सोनोग्राफी चालकांकडून बेकायदा गर्भलिंगनिदान केले जात असल्याचे उघड झाले आहे. सातपूरमध्ये एका डॉक्टरने चक्क इनोव्हा मोटारीत सोनोग्राफी केंद्र सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने तब्बल दोन महिने पाळत ठेवून या संबंधित डॉक्टरचे पितळ उघडकीस आणले आहे. आदिवासी भागातील महिलांची मोटारीतच तपासणी करून गर्भलिंग निदान करण्याचा उद्योग असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. संबंधित डॉ. तुषार पाटीलच्या सातपूरमधील सोनोग्राफी केंद्राची नोंदणी निलंबित केली आहे. त्याचबरोबर त्याच्या विरोधात न्यायालयीन दावा दाखल करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. सातपूरमधील एमएचबी कॉलनीत शाकुंतल डायग्लोस्टिक सेंटर या नावाने डॉ. पाटील याचे सोनोग्राफी केंद्र आहे. डॉ. पाटील आपल्या इनोव्हा मोटारीत सोनोग्राफीद्वारे गर्भलिंग निदान करीत असल्याची तक्रार महापालिका कार्यक्षेत्रात कार्यरत ‘आमची मुलगी’ या वेबसाइटवर फेब्रुवारीत प्राप्त झाली. तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मोटारीची तपासणी केली असता, डिक्कीत रुग्णांची सोनोग्राफी करण्यासाठी लागणारे, गादी, दोन प्रोब, सोनी व्हिडीओग्राफिक प्रिंटर, लॅपटॉप, गादी, दोन उशा, वेगवेगळे वायर कनेक्टेड, यूपीएस, की बोर्ड, सोनोग्राफी जेल, टिश्यू पेपर आदी साहित्य आढळून आले. महापालिकेने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. हा खुलासा असमाधानकारक असल्याने त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सोमवारी मशिन जप्त केली.

उद्धव ठाकरे, राऊत यांच्यासह चौघांविरुद्ध समन्स

यवतमाळ मराठा समाजाच्या मूक मोर्चावर आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्याप्रकरणी ‘सामना’चे संपादक तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, राजेंद्र भागवत व व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्यावर मंगळवारी पुसद न्यायालयाने समन्स बजावला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर मूक मोर्चा काढून आपल्या मागण्यांना वाचा फोडली होती. हे मोर्चे शांततेत निघाले असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये या मोर्चाची टिंगल उडवत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशीत करण्यात आले होते. त्यावरून मराठा समाजातून संतप्त प्रतिक्र‌िया उमटल्या होत्या. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी हे व्यंगचित्र काढले होते. सामनामध्ये हे व्यंगचित्र प्रकाशित होताच राज्यभर मराठा समाजात संतापाची लाट उसळली होती. ठिकठिकाणी मराठा समाजाने शिवसेनेच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले होते. याच व्यंगचित्राविरोधात पुसद येथील अॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी २६ सप्टेंबर २०१६ रोजी पुसद येथील न्यायालयात तक्रार दाखल करून ‘सामना’मधील व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तक्रारीनुसार व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचे दिसून येताच प्रथम श्रेणी न्यायाधीश अनंत बाजड यांनी भादंवीच्या ५०१ व ५०६ अंतर्गत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, राजेंद्र भागवत व व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई या चौघांविरुद्ध समन्स बजावला आहे. समन्सनुसार चौघांनाही १९ डिसेंबर रोजी पुसद न्यायालयात हजर व्हायचे आहे. पुरावे व साक्षीवरून चौघांना दोषी ठरवून न्यायालयाने समन्स पाठविले असल्याचे फिर्यादींचे वक‌िल अॅड. आशिष देशमुख यांनी सांगितले.

रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची हत्या

अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार केले, त्यानंतर डोक्यात दगड घातले आणि अनिकेतची हत्या करण्यात आली. Marathi News > Pune > रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची हत्या रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची हत्या अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार केले, त्यानंतर डोक्यात दगड घातले आणि अनिकेतची हत्या करण्यात आली. By: नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड | Last Updated: > Tuesday, 21 November 2017 8:21 AM Aniket Jadhav killed by unknown person latest updates पिंपरी चिंचवड : पिंपरीतील सराईत गुंड अनिके जाधवची हत्या झाली आहे. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथे ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार केले, त्यानंतर डोक्यात दगड घातले आणि अनिकेतची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मात्र अद्याप ठोस कारण समोर आले नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, अनिकेत रावण सेनेचा प्रमुख असल्याची माहितीही हाती येते आहे.

साताऱ्यातील उंब्रजमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

कुऱ्हाडींसह इतर शस्त्रांसह आलेल्या दरोडेखोरांनी बाजारपेठेतील दुकानं फोडली, घरांचे बंद दरवाजे तोडले. सातारा : सातारा जिल्ह्यातील उंब्रज भागात दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दरोडेखोरांनी दुकानं, घरं फोडत लोकांना मारहाणही केली. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला आहे. जेनून करीम मुल्ला असे मृत महिलेचं नाव आहे.कुऱ्हाडींसह इतर शस्त्रांसह आलेल्या दरोडेखोरांनी बाजारपेठेतील दुकानं फोडली, घरांचे बंद दरवाजे तोडले.उंब्रजमधील संपूर्ण परिसरात या दरोडेखोरांची सध्या दहशत पाहायला मिळते आहे. लोक हादरुन गेले आहेत. पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.दरम्यान, दरोडेखोरांनी किती मुद्देमाल चोरला, हे अद्याप नेमकं कळू शकलेलं नाही.

सहा खासदार, २१ आमदार लवकरच निवृत्त

डॉ. सावंत, पोटे, तटकरे, ठाकरे यांचा समावेश पुढील वर्षांत राज्यसभेचे सहा खासदार आणि विधान परिषदेच्या २१ आमदारांची मुदत संपत असून, निवडणुकांना अद्याप काही कालावधी असला तरी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांतील इच्छुकांनी नगरसेवकांना ‘वश’ करण्यावर भर दिला आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये समावेश आहे. राज्यसभेच्या सहा खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपुष्टात येत आहे. विधान परिषदेचे विधानसभा सदस्यांमधून निवडून येणारे ११ सदस्य, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील प्रत्येकी दोन, स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सहा सदस्य निवृत्त होत आहेत. सहा खासदार निवृत्त राज्यसभेचे वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. सदस्यसंख्येनुसार भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येऊ शकतो. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्त असली तरी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करण्याचे धाडस करेल का, यावर बरेच अवलंबून असेल. ११ जागांसाठी चुरस विधानसभेतून निवडून येणाऱ्या ११ सदस्यांसाठी चुरस होण्याची चिन्हे आहेत. निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या २७ मतांची आवश्यकता आहे. भाजपचे १२२ आमदार असून, छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने पाचवी जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिवसेनेचे दोन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. पाचवी जागा निवडून आणण्याकरिता भाजपला १३५ मतांची आवश्यकता भासेल. पाचव्या जागेकरिता भाजपकडून आर्थिकदृष्टय़ा तगडय़ा उमेदवाराला उतरविले जाईल, अशी शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी आघाडीत राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. यंदा काँग्रेसच्या दोन उमेदवारांना राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा, असे ठरले आहे. हे आश्वासन कसे पाळले जाते यावर आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. स्थानिक प्राधिकारीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी नाशिक, लातूर-उस्मानाबाद-बीड, परभणी-हिंगोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होत आहे. गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये राजकीय संदर्भ बदलले आहेत. भाजपचे संख्याबळ वाढल्याने या निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळू शकतात. अर्थात या मतदारसंघांच्या निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकता येतात. हे आमदार निवृत्त होणार सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, निरंजन डावखरे, जयंत जाधव, बाबाजानी दुर्राणी, अनिल तटकरे (राष्ट्रवादी), माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, दिलीप देशमुख (काँग्रेस), भाई गिरकर, महादेव जानकर, प्रवीण पोटे, मितेश भांगडिया (भाजप), अनिल परब आणि डॉ. दीपक सावंत (शिवसेना), कपिल पाटील (लोकभारती), जयंत पाटील (शेकाप), अपूर्व हिरे (अपक्ष) असे २१ आमदार निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवृत्त होणाऱ्या २१ सदस्यांमध्ये सर्वाधिक आठ सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी चार सदस्य निवृत्त होत आहेत. शिवसेना (दोन), शेकाप, लोकभारती आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य निवृत्त होत आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येतील. रायगडमधील शेकापचे नेते जयंत पाटील यांनी लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये पक्षाकडे दोन किंवा तीनपेक्षा जास्त मते नसतानाही ११वा उमेदवार म्हणून विजय प्राप्त केला होता. सर्व राजकीय पक्षांमध्ये असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळेच जयंत पाटील यांना विजय मिळविणे शक्य झाले होते. गुप्त मतदानात मतांची फोडाफोड करून जयंत पाटील पुन्हा चमत्कार करणार का, असा प्रश्न आहे.